शिवसेनेच्या हंबरडा मोर्चात उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल , राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिले !!

Foto
छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील मोर्चात सहभागी झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "राजा उदार झाला हाती काय दिला... भोपळा... आता येता येता एका शेतकऱ्याने सांगितलं की, साहेब हाती टरबूज दिलं. राजा उदार झाला आणि हातात काय दिलं टरबूज. ही शेतकऱ्यांची थट्टा चालली आहे", असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

 "मी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३१ हजार कोटी रुपये पॅकेजचे समर्थन करायला मी तयार आहे, पण माझी एक अट आहे", असे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारकडे मोठी मागणी केली. सरकारने एक लाख रुपये दिवाळीपूर्वी एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, असे ठाकरे म्हणाले. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेने (युबीटी) छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी हंबरडा मोर्चा काढला. त्यावेळी ते बोलत होते.  

पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. याच पॅकेजबद्दल हंबरडा मोर्चा बोलताना ठाकरे म्हणाले, "मी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. बघा तुम्हाला पटतेय का? जीव उद्ध्वस्त झालंय. जमीन खरडून गेलीये, तुम्ही रब्बीचं पिक घेणार कसं? 50 हजार आम्ही का मागत आहोत, त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा की जमिनीची अवस्था काय झाली आहे."

उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी

"एका अटीवर मी सरकारच्या ३१ हजार कोटींच्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे. मुख्यमंत्री जे बोलले की, खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर मनरेगातून ३५० लाख रुपये देणार. मग मुख्यमंत्र्यांना तुमच्यावतीने आव्हान देतोय की, दिवाळीपूर्वी त्या साडेतीन लाखातील एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात टाकाच. बाकीचं आपण नंतर बघू", अशी मोठी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली आहे. 

शेतकऱ्याने न्याय मागितला तर राजकारण? ठाकरेंचा संतप्त सवाल

"मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होतात. आता मी तुमची नियत काढतो. पण, मी राजकारण करत नाहीये. एका शेतकऱ्याने मदतीसाठी विचारलं तर त्याला हे सांगतात की, बाबा राजकारण करू नको. मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांची मते पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मतांवर तुम्ही सरकार आणता. शेतकऱ्यांच्या मतांवर तुम्ही राजकारण करता आणि शेतकऱ्याने न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं? हे कुठले सरकार आहे?", असा उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला केला. 

"मनरेगातून शेतकऱ्याला साडेतीन लाख कसे देणार? द्यायचे तसे देऊन दाखवाच, पण एक लाख रुपये दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाका", असे आव्हान उद्धव ठाकरेंनी सरकारला दिले. ठाकरे म्हणाले, राजा उदार झाला आणि हाती टरबूज दिला. शिवसेनेने (युबीटी) काढलेल्या हंबरडा  मोर्चात उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. "राजा उदार झाला हाती काय दिला... भोपळा... आता येता येता एका शेतकऱ्याने सांगितलं की, साहेब हाती टरबूज दिलं. राजा उदार झाला आणि हातात काय दिलं टरबूज. ही शेतकऱ्यांची थट्टा चालली आहे", असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.